वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली-लोहगाव रोडलगत वाघोली हद्दीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या नवीन वाघोली ई-बस डेपोचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाला. सदर कार्यक्रम ‘पोलीस परेड ग्राउंड’ शिवाजीनगर येथे पार पडला.
‘ई-बस’ ची प्रतिकात्मक चावी अजित पवार यांचे हस्ते पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा व उपवनसंरक्षक (प्रादेशिक) राहुल पाटील यांना प्रदान करण्यात आली. वाघोली ई बस डेपोसह सिंहगड ई-बस सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
“पीएमपीएमएलच्या ई-बस सेवेमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहीत सेवा मिळणार आहे.”
-राजेंद्र सातव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस नेते)
यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्यासह पीएमपीएमएल, महाराष्ट्र शासन व वन विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थित होते.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एसटी महामंडळाच्या संप काळात पीएमपीएमएलच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.