भोसरीत महायुतीच्या मताधिक्‍क्‍यात घट

आघाडी मिळूनही आढळरावांची पिछाडी ः राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीही धोक्‍याची घंटा

महायुतीचा फायदा झालाच नाही

भोसरी विधानसभा निवडणुकीत त्यावेळी अपक्ष निवडणूक लढलेले व विद्यमान भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांना 60 हजार 143 मते, शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांना 44 हजार 857 मते तर भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांना 43 हजार मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विलास लांडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यांना 44 हजार 210 मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत महेश लांडगे, सुलभा उबाळे, एकनाथ पवार यांच्या मतांची गोळा बेरीज होवून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव यांना अधिकचे मताधिक्‍य अपेक्षित होते. त्या तुलनेत 38 हजारांचे मिळालेले मताधिक्‍य नगण्य असल्याचे आढळराव यांच्या समर्थकांनी खासगीत बोलून दाखविले.

पिंपरी – शिरुर लोकसभा मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना 38 हजारांचे मताधिक्‍य मिळाले असले तरी गतवेळच्या तुलनेत मतांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सहापैकी सर्वाधिक आघाडी या मतदार संघातून मिळाली असली मताधिक्‍यातील घट त्यांच्यासाठी तोट्याची ठरली. तर दुसरीकडे डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय होवूनही आढळरावांना मिळालेली मतांमधील आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धोक्‍याची घंटा ठरली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदार संघ हा कायम निर्णायक ठरतो. शिरुरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. कोल्हे यांचा विजय झाला असला तरी या मतदार संघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना 38 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही धोक्‍याची घंटा मानली जात आहे. मात्र, गतवेळच्या तुलनेत हे मताधिक्‍य कमी झाल्याने भाजप-शिवसेनेलाही सावध पावित्रा घ्यावा लागणार आहे. शिवसेना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरुर मतदार संघातून पराभव झाला असला तरी सहापैकी तीन मतदार संघामध्ये आढळरावांना आघाडी मिळाली आहे.

राष्ट्रवादीला करावी लागणार मशागत

डॉ. अमोल कोल्हेंना भोसरीतून मिळालेली पिछाडी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आत्तापासूनच मशागत करावी लागणार आहे. यावेळी मनसेने राष्ट्रवादीला साथ दिली असली तरी कॉंग्रेसचे पदाधिकारी हातचे राखून प्रचार यंत्रणेत दिसले. त्याचा परिणाम डॉ. कोल्हे यांना भोसरीतून मिळणाऱ्या मताधिक्‍यावर दिसला. त्यामुळे भोसरीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांना डॉ. कोल्हे यांच्या विजयावर समाधान मानून चालणार नाही. तर आत्तापासूनच कंबर कसावी लागणार आहे.

यामध्ये भोसरीतून सर्वाधिक 38 हजार, हडपसरमधून 7 हजार तर खेड विधानसभा मतदार संघातून 6 हजारांचे मताधिक्‍य आढळराव यांना मिळाले आहे. उर्वरीत जुन्नर, शिरुर व आंबेगाव मतदार संघातून कोल्हेंना चांगले मताधिक्‍य मिळाल्याने आढळरावांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभानिहाय मताधिक्‍याची आकडेवारी पाहता भोसरीमध्ये आढळरावांना मिळालेली आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी चिंतेची बाब ठरली आहे. लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट समजली जात होती. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छूक असलेल्यांनी चांगलाच जोर लावला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली. युतीच्या धोरणानुसार विद्यमान खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी देण्यात आली. भोसरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावत आमदार लांडगे यांनी आढळरावांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला होता. ते उमेदवार असतील तर काम न करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर आढळरावांनी लांडगेची भेट घेत समझोता केला. आमदार लांडगेंनी आपला शब्द पाळला तरी भाजपचे काही पदाधिकारी आढळरावांच्या विरोधात काम करीत असल्याचेही पहायला मिळाले. त्यामुळे महायुतीच्या मताधिक्‍यात घट झाल्याचे बोलले जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×