जिनिव्हा – सध्या जगभर लसींचा मोठा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर आता बालकांच्या लसीकरणाचा फार आग्रह धरण्याची गरज नाही आणि ती सध्या तरी उच्च प्राथमिकता नाही असे जागतिक आरोग्य संघटनेतील तज्ज्ञांनी म्हटले आहे. डॉ. केट ओब्रीयन यांनी म्हटले आहे की, बालकांचे लसीकरण ही जागतिक आरोग्य संघटनेची प्राथमिकता नाही.
कोविडचा मोठा फटका बालकांना बसत नाही, आणि जरी त्यांना याची बाधा झाली तरी त्यांची प्रतिकार शक्ती मोठी असल्याने त्यातून ते गंभीर आजारी पडत नाहीत. त्यामुळे बालकांना ही लस देण्याऐवजी ज्या देशात लसींचा तुटवडा आहे तेथे ही लस वितरीत करण्याला प्राधान्य देण्यात यावे असे त्यांचे म्हणणे आहे.
जगातील काही श्रीमंत देशांनी आपल्या देशातील 12 ते 15 वयोगटातील बालकांसाठीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. त्यात कॅनडा, अमेरिका आणि युरोपियन समुदायातील देशांचा समावेश आहे. त्या देशात प्रौढांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट जवळपास साध्य झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता बालकांच्या लसीकरणावर लक्ष देणे सुरू केले आहे.
जगातल्या श्रीमंत देशांनी त्यांच्याकडील लसीकरणाचे काम पुर्ण झाले असेल तर उर्वरीत लसी गरीब देशांना द्याव्यात असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसीस यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर ओब्रियन यांनी हे प्रतिपादन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या देशातील प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्या देशांतील लहान बालकांना आत्ताच लस देण्याची काहीही गरज नाही.