नगर -कापड बाजार परिसरातील हॉकर्ससाठी सोमवारपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. व्यापाऱ्यांचा विरोध होणार नाही, अशा पद्धतीने तोडगा काढण्यात येईल तसेच हॉकर्सना महापालिका वाऱ्यावर सोडणार नसून, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिले.
कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मनपा प्रशासनाने बैठक घेतली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, रिजवान शेख, हॉकर्स युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, राजू खाडे, रमेश ठाकूर, नंदकुमार रासने, नवेद शेख, अनिल ढेरेकर, संतोष रासने, फिरोज पठाण, नितीन नाळके आदी उपस्थित होते.
साहेबान जहागीरदार यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी. कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सना वाऱ्यावर न सोडता त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी केली. यावर आयुक्त गोरे यांनी कापड बाजारातील हॉकर्ससाठी सोमवार (दि.4 एप्रिल) पर्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.