पुणे – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार यापुढे राष्ट्रीयकृत बॅंकांबरोबर 30 टक्के रक्कम सहकार क्षेत्रातील शेड्युल बॅंकेतदेखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गुंतवणूक करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रातील नामवंत बॅंकांची आर्थिक स्थिती तपासून घेतल्यानंतरच गुंतवणूक केली जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत मांडलेल्या लेखा परीक्षण अहवालातून ही माहिती देण्यात आली.
अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी लेखा परीक्षण अहवाल सादर केला. विद्यापीठाच्या वतीने आता व्यापारी लेखांकन (मर्केंटाईल सिस्टम) पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ही पद्धत अवलंबणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांत गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी बदल करण्यात आलेले आहेत. विद्यापीठाच्या बॅंक खात्यातील उपलब्ध रक्कम, शैक्षणिक व प्रशासकीय विभागाच्या खर्चासाठी आवश्यक निधी याचा वेळावेळी आढावा घेऊन सर्वाधिक व्याज देणाऱ्या शेड्युल बॅंकेमध्ये गुंतवणूक केल्या जातात. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील प्रकरण 12 कलम 134
(7) अन्वये गुंतवणूक फक्त राष्ट्रीयकृत व शेड्युल बॅंका तसेच राज्याची गुंतवणूक असलेल्या बॉन्डस् व रोख्यामध्ये करावी, अशी तरतूद आहे. त्यास अनुसरून व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे राष्ट्रीयकृत बॅंकांबरोबर 30 टक्के रक्कम सहकार क्षेत्रातील शेड्युल बॅंकेतदेखील गुंतवणूक करण्यात येणार आहे. यापुढे व्याजाच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यास मदत होणार असल्याचे प्राचार्य जाधवर यांनी नमूद केले.