मुंबई – करोनाचे आव्हान संपलेले नाही. “ब्रेक दि चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत.
तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
“ब्रेक दि चेन’मध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असेही स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, गतवर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता. यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरं म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहील, असेही ते म्हणाले.
दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्यावर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.
करोना रुग्णाच्या संख्येत चढ-उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घालावेत. कुठल्याही दबावाला बळी न पडता निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे.
करोनामुक्त गावांची टक्केवारी गृहीत धरणार
नागरिकांनी कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे. यासाठी आपापल्या जिल्ह्यात पुरेशी जनजागृती करा अशा सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागात करोना वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी आपण करोनामुक्त गाव करा म्हणून आवाहन केले आहे. या करोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल, असे त्यांनी सांगितले.