मुंबई – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.
अशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मातोश्रीवरच ही भेट होईल असं सूत्रांनी सांगितलं आहे. या भेटीत स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काळ झालेल्या बैठकीनंतर नितीशकुमार, तेजस्वी यादव, राहुल गांधी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडले ते पाहता आगामी कालावधीमध्ये विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे. देशात कॉंग्रेस पक्षाशिवाय कोणतीही विरोधी आघाडी शक्य नाही, असे सतत सांगणारे नितीशकुमार यांच्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न जरी अवघड नसले, तरी याच पत्रकार परिषदेमध्ये नेतृत्वाचा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली, हेसुद्धा लक्षणीय आहे. नितीशकुमार यांनी आधीपासूनच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही असे अनेकवेळा स्पष्ट केले आहे.