मुंबई – राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या काळात मेट्रो 3 चे कारशेड आरे येथे करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, प्रस्तावित ठिकाणी बिबट्याचा अधिवास असून जैवविविधता असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे होते. आरेमधील बांधकामामुळे जंगलच नव्हेतर येथे असलेल्या जैवविविधतेवरही परिणाम होणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर मुंबईतील आरे कारशेडला मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. तसेच, कारशेड इतरत्र ठिकाणी तयार करण्याची मागणी केली होती.
मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विरोध झुगारुन काम सुरूच ठेवले होते. तसेच, आरेमधील झाडेही तोडण्यात येत होती. मात्र, त्यानंतर 2019 ला सत्तांतर होवून राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरेच्या कामाला स्थगिती दिली.
या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूर येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, कांजूर येथील जागेच्या मालकीवरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला होता. त्यावेळी उच्च न्यायालयानेही कांजूर येथील मेट्रो कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे गेली अडीच वर्षे हा प्रकल्प रखडला आहे.
मोठी बातमी! गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय
मात्र, राज्यात पुन्हा सत्तांतर होवून आता शिंदे गट आणि फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. या नव्या सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे तब्बल अडीच वर्षे स्थगित असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजप सर्वत्र सरकार पाडण्यात व्यस्त, शहीद दिनाच्या मेळाव्यात ममतांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला