पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दि. २८ एप्रिलला होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच दि. १९ मे या दिवशी होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी गट ब, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर केल्या जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एमपीएससीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाणार स्पष्ट करण्यात आले आहे. यासंबंधीचे परिपत्रक आयोगाने प्रसिद्ध केले असून सविस्तर माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.