मुंबई : राज्यातील मुस्लिमधर्मीय मेहतर सफाई कामगारांना वारसा हक्काने शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात या सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आगामी मंत्रिमंडळ बैठकीत विषय सादर करून तात्काळ निर्णय घेणार असल्याचे तसेच या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात राज्यातील मुस्लिमधर्मीय मेहतर समाजातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, माजी आमदार आसीफ शेख, मेहतर समाज विकास महासमितीचे अध्यक्ष शकील बेग, शहनवाज गफार शेख यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
सामाजिक न्यायमंत्री मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रकरणात नियुक्ती देताना विविध प्रशासकीय विभाग व आस्थापनांना अडचणी आहेत. विविध संघटनांच्या मागण्या व लाड समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत यापूर्वी काढलेल्या शासन निर्णयांचे एकत्रीकरण करून सर्वसमावेशक बाबीसंदर्भात तातडीने सुधारित निर्णय घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
यावेळी मेहतर समाज विकास महासमितीचे अध्यक्ष शकील बेग यांनी या समाजातील सफाई कामगारांना वारसा हक्काने मिळणाऱ्या नियुक्तीतील अडचणी व इतर समस्यांचे निवेदन बैठकीत सादर केले.
वैदू समाजाला जातीचे दाखले मिळावेत
वैदू समाज हा एकाच ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे या लोकांकडे 1961 पूर्वीचे पुरावे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्रे मिळत नाहीत त्यामुळे अशा समस्या ज्या ठिकाणी आहेत तिथे सामाजिक न्याय विभागाने वैयक्तिकरित्या संबधित अधिकाऱ्यांना पाठवून या समस्यांचे निराकरण करावे. भविष्यात जातीचे दाखले देताना सामाजिक न्याय विभाग अनेक सुधारणा करणार असल्याचेही यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला वैदू समाज नवचेतना संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद शिंदे, खजिनदार विनोद पवार, बाबासाहेब लोखंडे तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सदस्य उपस्थित होते.