कन्टेंन्मेंट झोन निश्चित झाल्यानंतरच परवानगीबाबत विचार
मजुरांच्या सुरक्षेबाबतही घेतला जाणार सर्वंकष आढावा
पुणे – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्यशासनाने सोमवारपासून काही क्षेत्रांवरील निर्बंध शिथिल करण्याचे सूचित केले आहे. त्यात बांधकाम क्षेत्राचाही समावेश आहे. मात्र, पुण्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आठ दिवसानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
शहरात करोना रुग्ण सापडलेल्या भागात महापालिकेकडून कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात येत असून, ज्या बांधकामांच्या ठिकाणी सर्व नियमांची पूर्तता तसेच बांधकाम मजूर साइटवरून कोणत्याही कारणास्तव बाहेर पडणार नाहीत, अशा बांधकामांची माहिती संकलित करूनच याबाबतचा निर्णय पुढील आठ दिवसांत घेण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.
राज्यशासनाने नुकत्याच काढललेल्या आदेशात ज्या बांधकाम साइटवर मजूर राहत असतील, त्या ठिकाणी बांधकामाचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. काम करताना सोशल डिस्टन्स पाळले जाईल, मजुरांना कोणतेही साहित्य अथवा कोणत्याही वस्तू आणण्यासाठी बाहेर पाठवले जाणार नाही. अशा अटींवर या बांधकामांना परवानगी देण्यास शासनाने अनुकूलता दर्शवली आहे. तसेच त्यासाठीचे अधिकार महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीत तूर्तास त्याची अंमलबजावणी केली जाणार नसून आठ दिवसानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
महापालिका घेणार सखोल माहिती
राज्यशासनाने दिलेल्या आदेशात, “ज्या बांधकाम साइटच्या ठिकाणी लेबर कॅम्पमध्ये मजूर सध्या वास्तव्यास आहेत. बांधकाम मजूर बाहेरून आणण्याची गरज नाही, तसेच जो भाग कंटेन्मेंट झोनमध्ये येत नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेऊन बांधकाम परवानगी दिली जाऊ शकते,’ असे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पुढील आठ दिवसांत अशा साइटची माहिती घेतली जाणार आहे. तसेच त्या साइटवर खरचं बांधकाम मजूर आहेत का, साइटपासून ते किती अंतरावर आहेत. त्यांच्या जेवणाची सोय त्या ठिकाणीच आहे का, बांधकाम करण्यासाठी बाहेरून कोणतेही साहित्य न आणता सर्व साहित्य साइटच्या ठिकाणी उपलब्ध आहे का, संबंधित साइटच्या परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या कशा प्रकारे वाढत आहे, अशी वेगवेगळी माहिती संकलित करून त्याची तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
पुढील दहा दिवस पुण्यात लॉकडाऊन आणखी कडक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे यात कोणतीही सूट देण्यात येणार नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसांत बांधकामे सुरू करण्याबाबत आधी बांधकाम विभाग सर्व प्रकरची तपासणी करेल. त्यांनतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.
– रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त