पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामध्ये महामेट्रोचे काम सुरू आहे. चालू वर्षीच्या डिसेंबर अखेर प्रवाशांना प्रत्यक्ष मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. पिंपरी ते दापोडी व कोथरुड वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन मार्गावर डिसेंबर अखेर केंद्र शासनाच्या मान्यतेने मेट्रो धावणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोमध्ये प्रवाशांना आपल्या सायकलस प्रवासाला मुभा दिली जाईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज (दि. 26) पत्रकार परिषदेत दिली.
त्यासाठी आज व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी यांनी फुगेवाडी स्थानक ते संत तुकाराम नगर स्थानक असा सायकल घेऊन मेट्रोमधून प्रवास केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचा दावा केला.
महामेट्रोचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून प्रत्यक्ष मेट्रोचा प्रवास सुरू होण्याची नागरिकांना प्रतिक्षा आहे. त्यामध्ये आता महामेट्रोने सायकल सहित प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे प्रवाशांना सायकलसह मेट्रोमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. आज (दि. 26) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी यांनी मेट्रोच्या मार्गावर याबाबतची प्रत्यक्ष चाचणी घेतली.
प्रवासादरम्यान मेट्रोचे अधिकाऱ्यांनी सायकली लिफ्टद्वारे फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या फलाटावर आणल्या. तेथून मेट्रोमध्ये सायकलसह प्रवेश केला. मेट्रो ट्रेन तेथून संत तुकाराम नगर स्थानकावर पोहचली. संत तुकाराम नगर स्थानकाच्या लिफ्टचा वापर करून सर्वजण सायकलसह स्थानकाच्या बाहेर आले. त्यानंतर सर्व अधिकारी सायकलहून एपीजे अब्दुल कलाम उद्यानात गेले. तेथून परत येऊन संत तुकारामनगर फुगेवाडी स्थानकात सायकलसह आले.
याबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, सायकल आणि मेट्रोचा वापर करून विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, महिला, सेल्समन, वस्तूंचे घरोघरी वितरण करणाऱ्या व्यक्ती मेट्रोचा सहतेने वापर करू शकतात. मेट्रो हे एक अत्यंत सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवास माध्यम आहे. मेट्रोमध्ये महिला आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र नारीशक्ती डबा लावण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकांवर आणि मेट्रो कोचमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणार आहे. त्यामुळे मेट्रोची सर्व स्थानके आणि डबे कायम निगराणीखाली असल्याने अनुचित प्रकारास आळा बसण्यास मदत होणार आहे.
पुणे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून नावारूपास आले होते. परंतु मधल्या काळात शहरात वाहतुकीसाठी सशक्त पर्याय नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली, त्यामुळे प्रदूषण वाढले आणि प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात वाढ होत गेली. येऊ घातलेल्या महामेट्रोने सायकलला प्रोत्साहन देण्याचे ठरविल्याने पुणे पुन्हा आपल्या जुन्या वैभवाप्रमाणे सायकलींचे शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी मदत होणार असा दावाही दीक्षित केला.
10 ते 60 रुपये तिकीट
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. यासाठी किमान 10 ते जास्तीत जास्त 60 रुपये तिकीट आकारले जाणार आहे. पहिल्या एक किलोमीटरसाठी 10 रुपये तिकीटापासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर जसजसे किलोमीटर वाढत जातील तसे तिकीटाचे दर वाढतील. पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी ते संत तुकारामनगर स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये तिकीट असणार आहे. जसजसा प्रवास वाढत जाईल, तशी त्यामध्ये वाढ होईल. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रवास करण्यासाठी 60 रुपयांपेक्षा जास्त पैसे तिकीटासाठी मोजावे लागणार नाहीत, असे डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.