पुणे – डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित डेक्कन जिमखाना करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी संघाने सलग दुसरा विजय मिळवला. आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमी आणि डेक्कन जिमखाना क्लब ब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले.
डेक्कन जिमखाना क्लब आणि पीवायसी हिंदू जिमखानाच्या मैदानांवर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राचा रणजीपटू आणि इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेतील हैद्राबाद सनरायझर्स संघातील प्रमुख फलंदाज राहुल त्रिपाठी याच्या ६५ धावांच्या जोरावर डेक्कन जिमखाना क्लब ब संघाने पुना क्लब संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुना क्लब संघाने १३२ धावांचे आव्हान उभे केले. डेक्कन जिमखाना क्लब ब संघाने हे आव्हान १५.२ षटकामध्ये व ३ गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये राहूल त्रिपाठी याने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली.
तनय संघवी याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना क्लब अ संघाचा २४ धावांनी पराभव करून गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् क्रिकेट अकादमीने १५५ धावा धावफलकावर लावल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना क्लब अ संघाचा डाव १३१ धावांवर मर्यादित राहीला. तनय संघवी याने ११ धावात ३ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्वप्निल गुगळे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा ६४ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१९ धावांचा डोंगर उभा केला. स्वप्निल गुगळे याने ४७ धावांची खेळी केली. सिद्धार्थ म्हात्रे (४७ धावा), हर्ष संघवी (नाबाद ४० धावा) आणि मेहूल पटेल (४२ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव १५५ धावांवर मर्यादित राहीला.