Deccan Gymkhana Trophy 2024 : डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित डेक्कन जिमखाना करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी संघ आणि पुना क्लब या संघांनी आपापल्या गटामधून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
डेक्कन जिमखाना क्लब आणि पीवायसी हिंदू जिमखानाच्या मैदानांवर झालेल्या सामन्यात निहाल तौसमद याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमीने आर्यन्स् क्रिकेट अकादमीचा ४ गडी राखून पराभव करत सलग तिसर्या विजयासह उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् क्रिकेट अकादमीने १६० धावा धावफलकावर लावल्या.
अमेय सोमण याने ५२ धावांची तर, यशराज खाडे ४४ धावा आणि किरण चोरमले ३० धावा यांनीही धावांचे योगदान दिले. निहाल तौसमद २३ धावात ४ गडी बाद केले. हे आव्हान पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमीने १७.२ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. सिद्धार्थ म्हात्रे (४१ धावा), ओंकार खाटपे (३० धावा), किर्तीराज वाडेकर (२७ धावा), यश खळदकर नाबाद (२० धावा) आणि हर्ष संघवी (नाबाद २० धावा) यांनी धावा जमवित संघाला विजय मिळवून दिला.
संग्राम भालेकर याच्या अष्टपैलू खेळीमुळे पुना क्लबने दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा ९ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुना क्लबने १६४ धावांचे आव्हान उभे केले. सागर बिरदावडे याने नाबाद ५९ धावांची खेळी केली. सौरभ नवले (२९ धावा), अथर्व काळे (२८ धावा) आणि संग्राम भालेकर (२६ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा डाव १५५ धावांवर मर्यादित राहीला. विनय पाटील याने ५० धावांची तर, पवन शहा याने नाबाद ४१ धावांची खेळी करून प्रयत्नांची शर्थ केली. संग्राम भालेकर याने २३ धावात ३ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचचला. नौशाद शेख याच्या ५६ धावांच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आर्यन्स् क्रिकेट अकादमीचा २७ धावांनी पराभव करून विजयासह स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.