Deccan Gymkhana Trophy 2024 ( Pune ) – डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित डेक्कन जिमखाना करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत अतितटीच्या आणि उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम सामन्यात डेक्कन जिमखाना क्लब अ संघाने सुपर ओव्हरमध्ये पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी संघाचा पराभव करून विजेतेपदाला गवणसी घातली.
डेक्कन जिमखाना क्लब मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमीने १७७ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये कर्णधार स्वप्निल गुगळे याने ५० चेंडूत ९ चौकारांसह ५९ धावांची खेळी केली. मेहूल पटेल याने ३७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ६० धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना क्लब अ संघाने सावध सुरूवात केली. क्रिश शहापुरकर (३९ धावा), यश क्षीरसागर (२५ धावा) आणि धीरज फटांगरे (२२ धावा) यांनी संघाला विजयीपथावर नेले होते. सुरज शिंदे याने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६७ धावांची खेळी करून संघाचा विजय निश्चित केला होता.
१२ चेंडूत १७ धावांची आवश्यकता असताना सुरज याने षटकार खेचला आणि एका षटकामध्ये ६ धावांची आवश्यकता असे डेक्कन जिमखाना संघासाठी विजयाचे गणित आणून ठेवले. पीबीकेजे अॅकॅडमीच्या निहाल तौसमद याने अंतिम षटक टाकताना पहिल्या ३ चेंडूत ४ धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर डेक्कन जिमखानाचा दिपक डांगी धावबाद झाला. दोन चेंडूवर २ धावांची गरज असताना साहील कड याने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली आणि सामन्यात बरोबरी झाली. अंतिम चेंडूवर डेक्कन जिमखानासाठी जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता होती. निहालने टाकलेला चेंडू सुरज शिंदे याला फटकावण्यात अपयश आले आणि सुरज धावबाद झाला. त्यामुळे सामना ‘टाय’ झाला आणि सुपरओव्हरचा अवलंब करण्यात आला.
IND vs ENG 3rd Test : ‘सर जडेजा’समोर ‘बेझबॉल’ रणनिती फेल, भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय…
सुपरओव्हरमध्ये डेक्कन जिमखाना संघाने धीरज फटांगरे (नाबाद १३ धावा) आणि सुरज शिंदे (नाबाद ६ धावा) यांच्या फलंदाजीमुळे बिनबाद २० धावा केल्या. पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमीला केवळ १७ धावाच करता आल्या आणि डेक्कन जिमखाना विजेतेपदाला गवसणी घातली.
Deccan Gymkhana Trophy 2024 : डेक्कन जिमखाना क्लब- पुनित बालन अॅकॅडमीत विजेतेपदासाठी लढत..
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मानद सचिव सुभेंद्र भांडारकर आणि महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार शंतनु सुगवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमीचे हर्षद पाटील, डेक्कन जिमखाना क्लबचे स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव मृगांक राठी, डेक्कन जिमखाना क्लबचे अजय गुप्ते, एमसीएचे सीओओ अजिंक्य जोशी, पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आदि उपस्थित होते.