नगर, (प्रतिनिधी) – दुकानासमोरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी महिला व्यावसायिकाने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि. १५) शहरातील चितळे रोड येथील अतिक्रमणे हटविली आहे. या कारवाईत टपऱ्या हटविण्यात आल्या असून लोखंडी टेबल, लोखंडी पलंग अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले आहे.
शहरातील चितळे रोड येथील दुकान नं.६, साई कॉर्नर, युनियन बैंक शेजारील दुकानासमोर अतिक्रमण करण्यात आले होते. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत दुकानदार शुभांगी अरुण ओहोळ यांनी डिसेंबर २०२० प्रासून महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहे. मात्र महिला दुकानदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर कारवाई केली. अद्यापपर्यंत मनपाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नव्हती. अतिक्रमण विरोधी पथक येणार असल्याची माहिती संबंधित अतिक्रमण धारकांना आधीच मिळत असल्याने सर्व सामान शेजारील बोळीत ठेवून पथक निघून गेल्यानंतर सदरचे सामान पुन्हा दुकानासमोर आणून अतिक्रमण केले जात असल्याचे ओहोळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदर अतिक्रमणामुळे दुकानात प्रवेश करण्यास त्रास होतो. तसेच पार्किंग करू शकत नाही. संबंधित अतिक्रमण करणारे माझ्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांशी दारू पिऊन शिवीगाळ आणि वाद घालतात. महिलांवर दुकानासमोरील सामान कमेंटस् करतात. अतिक्रमण हटविण्यास सांगितल्यास अंगावर धावून येणे, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत असल्याचे या महिला दुकानदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीची अखेर दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, प्रभाग अधिकारी कोतकर, क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे यांच्या आदेशाने चितळे रोडवर अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. यावेळी दुकानासमोरील लोखंडी टेबल, पलंग टाकून हळदी-कुंकू, पुजेचे साहित्य विकणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. टपऱ्या हटवून इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.