Deccan Gymkhana Trophy 2024 – डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‘डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना क्लब अ संघाने आणि पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना क्लब मैदानावर झालेल्या सामन्यात धीरज फटांगरे याच्या नाबाद ७८ धावांच्या जोरावर डेक्कन जिमखाना अ संघाने डेक्कन जिमखाना ब संघाचा ८ गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना ब संघाने १५३ धावांचे लक्ष्य उभे केले. आदर्श बोथरा (३९ धावा) आणि हृषीकेश कुलकर्णी (३८ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. डेक्कन जिमखाना अ संघाने १८.५ षटकात व २ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. धीरज फटांगरे याने नाबाद ७८ धावांची तर, क्रिश शहापुरकर याने ५८ धावांची खेळी केली. या दोघांनी ७९ चेंडूत ११४ धावांची सलामी देत संघाच्या विजयाच्या पाया रचला.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या दिग्विजय जाधव याच्या नाबाद ६४ धावांच्या स्फोटक फलंदाजीमुळे पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमीने पुना क्लबचा १५ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पीबीकेजे अॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८५ धावा धावफलकावर लावल्या. दिग्विजय जाधव याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. किर्तीराज वाडेकर याने नाबाद ३५ धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पुना क्लबचा डाव १७० धावांवर मर्यादित राहीला.
डेक्कन जिमखाना करंडक 2024 : डेक्कन जिमखाना क्लबचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत…
सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
डेक्कन जिमखाना बः २० षटकांत ८ गडी बाद १५३(आदर्श बोथरा ३९, हृषीकेश कुलकर्णी ३८; यश क्षीरसागर २-१४, पियुष साळवी २-२०, राजवर्धन हिंगणेकर २-२६) पराभूत वि. डेक्कन जिमखाना अः १८.५ षटकात २ गडी बाद १५७ (धीरज फटांगरे नाबाद ७८, क्रिश शहापुरकर ५८; सामनावीरः धीरज फटांगरे;
पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १८५ (किर्तीराज वाडेकर नाबाद ३५, दिग्विजय जाधव नाबाद ६४; ओंकार आखाडे २-२८) वि.वि. पुना क्लबः २० षटकात ८ गडी बाद १७० (प्रणय सिंग नाबाद ३९, सौरभ नवले ६८; यश खळदकर २-३०, स्वप्निल गुगळे २-२६); सामनावीरः दिग्विजय जाधव.