पुणे -डेक्कन इलेव्हन फुटबॉल क्लबतर्फे आयोजित पहिल्या डेक्कन प्रीमिअर लीग 9-अ-साइड फुटबॉल स्पर्धेत डेक्कन रायनोज संघाने डेक्कन डॉल्फीन्स संघाचा पराभव करून चॅम्पियन्स गटाचे विजेतेपद मिळवले. प्लेट गटामध्ये डेक्कन वुल्व्हज संघाला विजेतेपद मिळाले.
या स्पर्धेत मयांक नाईक याच्या अफलातून गोलामुळे डेक्कन रायनोज संघाने डेक्कन डॉल्फीन्स संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. प्लेट गटात डेक्कन वुल्व्हज संघाने टायब्रेकमध्ये डेक्कन स्कॉर्पियन्स संघाचा 4-1 असा पराभव करून विजेतपद मिळवले.
स्पर्धेमध्ये काही नावीन्यपूर्ण नियमांचा अंतर्भाव करण्यात आला होता. सामना सुरू असताना मैदानावरील 9 खेळाडूंपैकी एक मुलगी, एक 30 वर्षांवरील खेळाडू आणि एक 19 वर्षांखालील खेळाडू नेहमीच असावा, असा नियम होता. या नियमांमुळे स्पर्धेत 19 वर्षांखालील ते 30 वर्षांवरील असे सर्वच वयोगटातील खेळाडू एका संघामध्ये होते आणि त्यामुळे
स्पर्धेत एक अनोखी चुरस पाहावयास मिळाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयकॉन ग्रुपचे कार्यकारी संचालक अभिषेक ताम्हाणे, डेक्कन इलेव्हन क्लबचे अध्यक्ष अविनाश अदिघे, डेक्कनइलेव्हन क्लबचे सचिव मंदार ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल ( चॅम्पियन गट : अंतिम )
डेक्कन रायनोज : 1 (मयांक नाईक 18 मि.) वि. वि. डेक्कन डॉल्फीन्स : 0. उपांत्य फेरी : डेक्कन डॉल्फीन्स : 1 (यश गोगरे 22 मि.) वि. वि. डेक्कन टायगर्स : 0.
डेक्कन रायनोज : 3 (अर्थव कुलकर्णी 9, 18, 27 मि.) वि. वि. डेक्कन बुल्स : 1 (रोहन गोगटे 23 मि.). प्लेट गट : डेक्कन वुल्व्हज : 4 गोल टायब्रेकमध्ये वि. वि. डेक्कन स्कॉर्पियन्स : 1 गोल.