भोपाळ – मध्यप्रदेशातील एका खासगी रूग्णालयात श्वसनाला त्रास होतो आहे म्हणून दाखल झालेल्या एका 55 वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले होते. तिला तेथील अतिदक्षता विभागात दाखल करणे अपेक्षित होते पण त्या अतिदक्षता विभागाची किल्लीच सापडली नाही म्हणून या महिलेला बाहेरच ताटकळत ठेवण्यात आले होते तेथेच तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार उज्जेैन जिल्ह्यातील एका रूग्णालयात गुरूवारी घडल्याचे निदर्शनाला आले आहे.
या महिलेला करोना सदृश लक्षणे दिसून आल्यानंतर तिला माधवनगरातील रूग्णालयात हलवण्यात आले. तेथे करोनावर उपचार केले जात आहेत. या महिलेला ऍम्ब्युलन्स मधून तेथे नेले गेल्यानंतर तेथे रूग्णालयातील आयसीयु युनिटच कुलुप लाऊन बंद असल्याचे आढळून आले आणि तेथील कर्मचारीही गायब होते. शेवटी आयसीयु युनिटचे कुलुप तोडून सदर महिलेला तिथे दाखल करण्यात आले पण तोपर्यंत खुप उशिर झाला होता. मधल्या काळात तिची तब्बेत खुपच खालावल्यामुळे डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. दरम्यान या प्रकरणाची आता चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून तेथील दोन डॉक्टरांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकारावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.