पुणे – राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची भरती व शिक्षण विभागाची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही एकाच दिवशी येत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अखेर शिक्षण विभागाने एक पाऊल मागे येत “टीईटी’ची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा 31 ऑक्टोबरऐवजी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आरोग्य विभागाची “क’ व “ड’ संवर्गासाठी 25 व 26 सप्टेंबरला लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, तयारी अपूर्ण असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. आता “क’ संवर्गासाठी 24 ऑक्टोबरला तर “ड’ संवर्गासाठी 31 ऑक्टोबरला परीक्षा घेण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. “टीईटी’साठी आधी 10 ऑक्टोबर ही तारीख ठरविण्यात आली होती. मात्र, या दिवशी यूपीएससीची परीक्षा येत असल्याने 31 ऑक्टोबरला “टीईटी’ घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
दरम्यान आरोग्य विभाग व “टीईटी’ परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. “टीईटी’च्या परीक्षेची तारीख बदलण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार “टीईटी’ची तारीख बदलण्यात आली आहे. “टीईटी’साठी 3 लाख 30 हजार 542 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे.