Buldhana Bus Accident : समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामधील आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. या अपघातात बसचा ड्रायव्हर दानिश शेखला किरकोळ दुखापत झाली असून तो या अपघातातून बचावला आहे. या घटनेबाबत त्याने अधिक माहिती दिली आहे.
ड्रायव्हर दानिश शेख याने बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा दावा खरा आहे की खोटा हे तपासानंतरच समोर येईल. कारण अपघातग्रस्त गाडीचे सर्व टायर जळून खाक झाले आहेत. टायर फुटल्याचा काहीही पुरावा किंवा निशाणी घटनास्थळी मिळालेली नाही. त्यामुळे खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात घडला, याचा तपास केला जाणार आहे. या घटनेनंतर बसचालक दानिश शेख इस्माईल शेख याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली त्यानंतर पलटी झाली त्यानंतर लगेच बसने पेट घेतल्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते. बसला आग लागताच यातील 8 प्रवासी काचा फोडून बाहेर पडले. मात्र, बसमध्ये अडकलेल्या 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. डीएनए तपासणीसाठी सर्व मृतदेह बुलढाणा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.