वेल्हे (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यातील चार जणांचा करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. हे चार जण करोनाची लागण झालेल्या वेल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या संपर्कात आले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारी घेत लागण झालेल्या व्यक्तीच्या क्लोज संपर्कात येणाऱ्या चार जणांना तपासणीसाठी नेले होते.
ग्रामीण रूग्णालयातील एका कर्मचाऱ्यास शनिवारी करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर तपासणीस नेलेल्या त्या चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील संक्रमणाचा धोका तुर्तास तरी टळला आहे.असे असले तरी आणखी १५ दिवस या चौघांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्यावर आरोग्य विभाग व महसूल विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
वेल्ह्यात एकूण ९ रूग्ण झाले आहेत. पानशेत परिसर हाद्दीतील ८ रूग्ण तर वेल्ह्यात १ रूग्ण आहे. नवीन रूग्ण आढळलेल्या ठिकाणापासून ५ किमी पर्यंतचा परिसर सील केला आहे. कोंढावळे खुर्द, कोंढावळे बुद्रूक, धानेप, हिरपोडी, भट्टीवाग, ब्राम्हणघर, खोडद, वेल्हे बुद्रुक, वेल्हे खुर्द आदी गावे उपविभागीय अधिकारी भोर राजेंद्रकुमार जाधव यांनी बफर क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
वेल्हे तालुक्यातील सुरूवातीला सापडलेला रूग्ण बरा झाल्याने तालुका करोनामुक्त झाला होता.परंतू काही दिवसांनी एकाच परिसरात ८ रूग्ण आढाळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. यावर प्रशासनाने मात करात आजूबाजूचा परिसर सील करून चेकपोस्ट बसवले. आरोग्य विभागाकडून नागरिकांची कसून तपासणी करण्याचे काम युद्ध पातळीवर केले गेले. याला काही दिवस उलटत नाहीतर वेल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात एक करोनाग्रस्त व्यक्ती आढळून आली. यामुळे आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यांची चांगलीच दमछाक झाली. नवीन सापडलेल्या रूग्णामुळे ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून गेलेल्या नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली होती. चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने प्रशासनासह सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.