निमसाखर -निमसाखर (ता.इंदापूर) येथे होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराची वालचंदनगर पोलीस स्टेशनकडून गंभीर दखल घेतली आहे. येथील शाळा व बसस्थानक परिसरात रोडरोमीओंची खैर केली जाणार नाही, त्यांच्यासाठी दंडुका तयार असून व्यापाऱ्यांनी देखील अशा तरूणांना दुकानालगत थांबू देऊ नका, असे अवाहन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले.
निमसाखर बसस्थानक परिसरात टवाळखोरी तसेच रोडरोमिओ सुरू असून दुचाकीवर तिघे, चौघे बसुन मुले घिरट्या घालत असतात. छेडछाडी प्रकारामुळे वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक फौजदार मोहन फाळके यांच्या टिमने कॉलेज व निमसाखर चौकात अचानक भेट दिली. यावेळी शाळा किती वाजता भरते, सुटते याची माहीती घेतली.
दरम्यान, विद्यार्थीनी बससाठी उशीरपणे थांबतात, यामुळे मुलींच्या सुरक्षेसाठी वेळो वेळी गरजेनुसार सीसीटिव्ही पाहण्याच्या सुचना संबंधीत कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी चौकामध्ये शिक्षक, पालक व चौकातील सर्व व्यापाऱ्यांना बोलावण्यात आले होते. वाहतूक पोलीस हवालदार रमेश शिंदे, गायकवाड यांनी निमसाखर येथे येऊन तपासणी करीत येथील शाळेमध्ये जाऊन शाळा प्रशासनाला खबरदारीच्या सुचना केल्या आहेत.
या चौकात भाईगीरी करणारी मुले, शाळेत दादागीरी मुले थांबणार नाही याची काळजी व्यापारी, दुकानदार तसेच नागरिकांनीही घ्यावी. अल्पवयीन मुलांकडे दुचाकी आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही पवार यांनी दिला.