रानमळा येथील पाड्यावर समाजसुधारक भोसले यांचे आवाहन
जेजुरी -आजच्या काळातही हजारो पारधी कुटुंब उघड्या माळावर, काटवनात, जंगलात राहून ऊन,वारा, पाऊस अंगाखांद्यावर घेवून आपली उपजीविका करीत आहे. आमची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, शासनाच्या सवलती मिळाव्यात यासाठी पारधी समाजाला माणुसकीच्या नात्याने गावव्यवस्थेत घ्यावे, असे आवाहन साहित्यिक व आदिवासी समाजसुधारक नामदेव भोसले यांनी समाजाला केले.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पीटीएसच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे तसेच पारधी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले यांनी जेजुरी परीसरातील रानमळा जवळील पारधी वस्तीला भेट दिली.
यावेळी पारधी समाजाच्या समस्या अडचणी, व्यथा जाणून घेतल्या. पोलिसांच्या वतीने अंकुश माने आणि सुरेखा वाघमारे यांनी या पाड्यावरील पारधी समाजातील व्यक्तींना, महिलांना कपडे, साड्या, मिठाई देवून त्यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान केला. यावेळी संदीप कारंडे, गणेश ठोसर आदी उपस्थित होते.