बापरे! बेलसरमध्ये झिका विषाणूचा संसर्गित

राज्यातील पहिला बाधित सापडल्याने खळबळ, आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला

पुणे/ बेलसर – केरळमध्ये सध्या डोके वर काढलेल्या झिका विषाणूचा राज्यातील पहिला संसर्गित पुरंदर तालुक्‍यातील बेलसर या गावात आढळला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा आरोग्य विभागाने या गावात आपला तळ ठोकला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या गावास भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली. हे वृत्त तालुक्‍यात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

झिकाचा संसर्ग डास चावल्याने होऊ शकतो. त्यामुळे बेलसरपासून पाच किमी त्रिज्येच्या क्षेत्रात सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यामंध्ये या विषाणूचे संसर्गित आढळले होते.

बेलसरमध्ये सुमारे दीड महिन्यापासून डेंग्यू, चिकनगुनिया आणि अन्य साथीच्या आजारांनी डोके वर काढले होते. त्यामुळे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे (एनआयव्ही) येथील रक्‍ताचे 51 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात केवळ एका रुग्णात हा विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. या संसर्गित व्यक्‍तीची प्रकृती सध्या ठीक आहे.

यात कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. झिकाचा संसर्ग टाळण्यासाठी डासांपासून वाचणे आवश्‍यक आहे. हा संसर्ग शुद्ध पाण्यात वाढणाऱ्या डासापासून होतो. त्यामुळे पाणी साचू देऊ नका. याचा संसर्ग गर्भवती महिलेकडून त्याच्या अर्भकाला होण्याची शक्‍यता असते किंवा संसर्गित व्यक्‍तीशी असुरक्षित शरीरसंबंध ठेवल्यास त्यातूनही संसर्ग पसरण्याची शक्‍यता असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

झिका वायरसची लक्षणे
झिका संसर्गितामध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. संसर्गितांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.

केरळ कनेक्‍शन
सध्या पुरंदर तालुक्‍यातून केरळमध्ये डाळींब विक्रीसाठी पाटवली जात आहेत. त्यामुळे तेथे गेलेल्या व्यापारी किंवा ट्रक चालकांकडून याचा संसर्ग येथे झाला असण्याची शक्‍यता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.