अहमदाबाद – प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी रंगलेल्या सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटणला 32-30 असे हरविले तर दुसरीकडे त्याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात तमिळ थलाईवाजने गुजरात फॉर्च्युनजाएंट्सला 34-28 असा पराभवाचा धक्का दिला.
दबंग दिल्लीने पुण्याविरुद्ध मध्यंतराला 19-11 अशी महत्त्वाची आघाडी मिळविली होती. त्यामध्ये त्यांच्या खेळाडूंनी केलेल्या सांघिक खेळाचा मोठा वाटा होता. पुण्याच्या खेळाडूंच्या चुका हेरून त्यांनी खेळावर नियंत्रण ठेवले होते.
उत्तरार्धात पुण्याच्या खेळाडूंनी चिवट लढत दिली. मात्र आघाडी घेण्यासाठी त्यांचे परिश्रम अपुरेच पडले. नवीनकुमार (11 गुण) व रणजित चंद्रन (8 गुण) हेच दिल्लीच्या विजयाचेशिल्पकार ठरले.