हैदराबाद :– महंमद रिझवान, अब्दुल्ला शफिक यांच्या जिद्दी शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेवर 6 गडी राखून थरारक विजय मिळवला. विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहण्याचा पराक्रमही पाकिस्तानने कायम राखला. श्रीलंकेला त्रिशतकी धावसंख्या उभारून देणारे कुशल मेंडीस व सादीरा समरविक्रमा यांची शतके मात्र, व्यर्थ ठरली.
वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 345 धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला. यासह पाकिस्तानने आयर्लंडचा विक्रम मोडला. आयर्लंडने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना सात विकेट्स गमावत 329 धावा करून जिंकला होता. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने 50 षटकांत नऊ गडी बाद 344 धावा केल्या. पाकिस्तानने 48.2 षटकात 4 गडी गमावत 345 धावा करत सामना जिंकला.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 345 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात डळमळीत झाली. इमाम उल हक व कर्णधार बाबर आझम स्वस्तात बाद झाले. त्यावेळी पाकिस्तानच्या 2 बाद 37 धावा झाल्या होत्या. यानंतर मात्र, अब्दुल्ला शफिकने महंमद रिझवानसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. शफिकने अर्धशतक पूर्ण करताना संघाचे शतकही साकार केले. पाठोपाठ रिझवाननेही अर्धशतकी पल्ला ओलांडला. या जोडीने संघाला द्विशतकी मजल मारुन दिली.
शफिकने आपले शतक थाटात पूर्ण केले. यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 113 धावांवर बाद जाला व ही जोडी फुटली. त्याने या खेळीत 103 चेंडूत 10 चौकार व 3 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर रिझवानला साथ देण्यासाठी सौद शकिल खेळपट्टीवर आला. रिझवान व शकिल यांनी भक्कम खेळ करत सामना श्रीलंकेच्या हातातून खेचून आणला. रिझवानने आपले शतक साकार केले.
शकिलनेही आत्मविश्वासाने फलंदाजी करत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. या जोडीने संघाचे त्रिशतक फलकावर लावले. मात्र, त्याचवेळी शकिल 31 धावांवर बाद झाला. या जोडीने 95 धावांची भागीदारी केली. रिझवानने त्यानंतर इफ्तेखार अहमदला साथीला घेत संघाचा विजय साकार केला. इफ्तेखारनेही नाबाद 22 धावा करताना 4 चौकार फटकावले. रिझवानने नाबाद 134 धावांची खेळी करताना 121 चेंडूत 9 चौकार व 3 षटकार फटकावले. श्रीलंकेकडून दीलशान मधुशंकाने सर्वाधिक 2 बळी घेतले.
Tons from Abdullah Shafique and Mohammed Rizwan guide Pakistan to the most successful chase in @cricketworldcup history 🔥#CWC23 #PAKvSL 📝: https://t.co/qVJCYjJyt3 pic.twitter.com/xfEl6xTBwl
— ICC (@ICC) October 10, 2023
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हसन अलीने कुशल परेराला बाद करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, त्यानंतर पाथुम निसांकाने कुशल मेंडीससह डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले. निसांका 61 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 51 धावा करुन बाद झाला. दरम्यान मेंडीसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले.
मेंडीसने सादीरा समरविक्रमाच्या साथीत शतकी भागीदारी करताना संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. मेंडीसने वादळी फलंदाजी करताना शतक साकार केले. त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 122 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत अवघ्या 77 चेंडूत 14 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली व पाकिस्तानच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला.
मेंडीस परतल्यावर सादीराने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत अर्धशतकी पल्ला पार केला. चारीथा असालंका व कर्णधार शनाका यांनी निराशा केली. यावेळी सादीराने धनंजय डीसील्व्हाच्या साथीत संघाचे त्रिशतक फलकावर लावताना वैयक्तीक शतकही साकार केले. शतकानंतर मात्र, तो लगेचच परतला. त्याने आपल्या 108 धावांच्या खेळीत 89 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 2 षटकार फटकावले. तळात दुनिथ वलिलागे यांने जिद्दी फलंदाजी केली व संघाला 9 बाद 344 अशी मजबूत स्थिती प्राप्त करुन दिली. पाकिस्तानकडून हसन अलीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. हॅरीस रौफने 2 बळी घेतले.