नवी दिल्ली – विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात पाकिस्तान संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. संघाच्या या सुमार कामगिरीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू व समालोचक रमीझ राजा यांनी टीका केली आहे. संघाचे गोलंदाज जर समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखू शकत नसतील तर त्यांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.
कर्णधार बाबर आझमचे संघावर कोणतेही नियंत्रण नसल्याचेच यातून दिसून येते. प्रत्यक्ष स्पर्धा काही तासांवर आलेली असतानाचा हा पराभव प्रत्यक्ष स्पर्धेत काय चित्र दाखवेल, अशीच भीती आता वाटू लागली आहे. असेही ते म्हणाले.
पाकिस्तानने सराव सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारल्यावरही न्यूझीलंडने हा सामना जिंकला. गोलंदाजांकडून अत्यंत सुमार कामगिरी झाली असून पाकिस्तान संघाने आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असेही राजा म्हणाले.
दरम्यान, 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आपला पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबरला पाकिस्तान धर्मशाळामध्ये इंग्लंडशी तर 14 ऑक्टोबर रोजी जगभरातील क्रीडाप्रेमींना आतुरता असणारा भारत-पाकिस्तान सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ –
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, सौद शकील, एम नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली, उसामा मीर आणि वसीम जूनियर
राखीव : अबरार अहमद, मोहम्मद हारिस आणि जमान खान