ICC Cricket World Cup 2023 #INDvNZ Semifinal : विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. जगभरातील करोडो चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्याशी भारतीय चाहत्यांचे भावनिक नाते आहे, कारण 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी टीम इंडिया न्यूझीलंडला हरवून त्या पराभवाचा बदला घेईल, अशी आशा चाहत्यांना आहे.
गेल्या 20 वर्षांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे, परंतु यावेळी टीम इंडिया उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करू शकते. कारण सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील 8 सामने जवळपास एकतर्फी जिंकले आहेत. या विश्वचषकात भारताने सर्व 9 संघांचा पराभव केला आहे.या स्पर्धेतील साखळी लढतीत भारताने न्युझीलंडचा पराभव केला होता व आता येत्या बुधवारीही हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत.
दरम्यान,भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडून नवा उच्चांक गाठण्याची सर्वोत्तम संधी मिळणार आहे. याच स्पर्धेत कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी लढतीत शतक फटकावताना सचिनच्या 49 शतकांची बरोबरी केली होती.
आता उपांत्य लढतीत त्याला हा विक्रम आपल्या नावावर जमा करण्याची संधी आहे. जर कोहलीला अपयश आले आणि भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली तर कोहलीची संधी कायम राहणार आहे. कारण या स्पर्धेनंतर भारतीय संघ लगेचच कोणतीही एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याने चाहतेही याच स्पर्धेत कोहलीच्या विक्रमाची प्रतिक्षा करत आहेत.