#CWC2023 #INDvAUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील पाचवा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे. तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने ही विक्रमी कामगिरी केली.
हार्दिक पांड्याविरुद्ध सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून विश्वचषकात मोठी कामगिरी केली असून, त्याने भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील भारताविरुद्धच्या त्याच्या पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने नऊ धावा पूर्ण करून एकदिवसीय विश्वचषकात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्सचा विक्रम त्याने मोडला आहे. सचिन आणि एबी डिव्हिलियर्सने 20 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजच्या व्हिव्हियन रिचर्ड्स आणि भारताचा दिग्गज सौरव गांगुली यांनी 21 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. तर मार्क वाॅ (ऑस्ट्रेलिया) आणि हर्शल गिब्स(द.आफ्रिका) यांनी 22 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
वनडे विश्वचषकात सर्वात कमी डावात 1000 धावा पूर्ण करणारे फलंदाज
डेव्हिड वॉर्नर : 19 डाव
सचिन तेंडुलकर/एबी डिव्हिलियर्स : 20 डाव
विव्ह रिचर्ड्स/सौरव गांगुली : 21 डाव
मार्क वॉ/हर्शल गिब्स : 22 डाव
डेव्हिड वॉर्नर : सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज
भारताविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 41 धावांवर बाद झाला. यासह त्याच्या 19 सामन्यांच्या 19 डावांत आतापर्यंत 1033 धावा केल्या झाल्या असून विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वॉर्नरने तिसरे स्थान पटकावले आहे. एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने 1743 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अॅडम गिलख्रिस्ट आहे, ज्याच्या नावावर 1085 धावा आहेत. डेव्हिड वॉर्नर 1033 धावांसह तिसऱ्या स्थानावर पोहलचला आहे. चौथ्या क्रमांकावर मार्क वॉ असून त्याच्या नावावर 1004 धावा आहेत. मॅथ्यू हेडनने 987 धावा केल्या आहेत.
वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू
रिकी पाँटिंग : 1743
अॅडम गिलख्रिस्ट : 1085
डेव्हिड वॉर्नर* : 1033*
मार्क वॉ : 1004
मॅथ्यू हेडन : 987