#CWC2023 #BangladeshCricket : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशाच्या टीमची कामगिरी काही फारशी चांगली झालेली नाही. धर्मशाला येथे झालेल्या सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर बांगलादेशने चार सामने गमावले आहेत. बांगलादेशला आपले पुढील दोन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळायचे आहेत. 29 ऑक्टोबरला त्यांना नेदरलँड्सविरुद्ध तर 31 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे.
बांगलादेश संघाला आता विश्वचषक स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील. एकही सामना गमावला तर बांगलादेशला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागेल. असं असताना, त्याचा कर्णधार शाकिब अल हसन वर्ल्डकप अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला आहे.
शाकिब मायदेशी परतण्याच कारण आता समोर आलं आहे. कोलकाता येथे होणारे दोन्ही सामने आणि उर्वरित सामन्यांच्या तयारीसाठी शाकिब बांगलादेशला परतला आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या मध्यभागी संघाचा कर्णधार त्याच्या सहकाऱ्यांपासून दुरावल्याचे क्वचितच घडले आहे. शाकिब काही काळासाठी ढाक्याला गेला आहे. तेथे तो त्याचा मेंटॉर (गुरू) नजमुल आबेदिन फहीम यांच्यासोबत प्रशिक्षण घेणार आहे तर बांगलादेशचे इतर खेळाडू कोलकाता येथे पोहोचले आहेत.
शाकिबने ढाका येथे केला सराव…
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या (ESPN-Cric info) नुसार, मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेशच्या 149 धावांनी झालेल्या लाजिरवाण्या पराभवाच्या दुसऱ्या दिवशी, शाकिब बुधवारी दुपारी ढाका येथे आला आणि आबेदिनसोबत प्रशिक्षणासोबत सराव करण्यासाठी थेट शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर गेला. त्याने तिथे तीन तास क्षेत्ररक्षणाचा सराव केला.
फहीम म्हणाला, “तीन दिवस तो या ठिकाणी सराव करणार आहे. त्यानंतर तो पुन्हा कोलकात्याला परतणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या विश्वचषक सामन्याच्या पूर्वसंध्येला बांगलादेश संघात सामील होणार आहे. आम्ही त्याच्या फलंदाजीवर काम केलं. शाकिबला कदाचित अशा प्रकारे काम करणं आरामदायक वाटत असेल. माहित नाही की, आम्ही पुढे काय करणार आहोत. मात्र प्रत्येक सेशन शाकिबच्या म्हणण्यानुसार आम्ही करणार आहोत.”
वर्ल्डकपमध्ये शाकिबची कामगिरी…
बांगलादेशच्या कर्णधाराने या विश्वचषकात साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यानं फलंदाजीत चार डावात केवळ 56 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत त्याने केवळ सहा विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशचा संघ एका विजयासह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे.