पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पहिले मूल ‘थॅलेसिमिया ग्रस्त आणि दुसऱ्यांदा गर्भवती. अशा परिस्थितीत दुसऱ्या मुलालाही हाच रक्तदोष निर्माण होऊ नये म्हणून हवालदिल झालेले जोडपे ससूनमध्ये उपचारासाठी आले; परंतु तेथील योग्य तपासण्या आणि उपचारांनी पोटातील बाळ निरोगी असल्याचे निदान झाले. ससूनमधील हा विभाग गर्भवती मातांसाठी वरदान ठरत आहे.
जाधव पती- पत्नी (आडनाव बदलले आहे) यांना दुसऱ्या गर्भारपणाची बातमी ही जेवढा आनंद घेऊन आली तेवढीच ती काळजीत टाकणारी होती. कारण त्यांचे पहिले मूल हे थॅलेसिमियाग्रस्त होते. त्याचा उपचार, वारंवार चढवावे लागणारे रक्त या सगळ्या अडचणींना ते आधीच त्रासले होते.
त्यामुळे हा गर्भ ठेवायचा की नाही, अशा द्विधा मनस्थितीत ते होते; परंतु ससून रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागांतर्गत असलेल्या ‘फोईटल मेडिकल विभागाने मोफत कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग (सीव्हीएस) तपासणी केली. त्यातून त्यांचे दुसरे मूल निरोगी असल्याचे निष्पन्न झाले.
ही शाखा अशाच जोडप्यांसाठी सुरू केली आहे, ज्यांना खासगी दवाखान्यातील महागडे उपचार आणि चाचण्या परवडत नाहीत; पण त्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे. बाळाच्या जन्माआधीच हे जोडपे आमच्याकडे आले आणि त्यांनी गर्भपात करण्याचे ठरवले होते. जेव्हा ते आमच्याकडे आले, तेव्हा पहिल्या मुलाच्या रक्त संक्रमणाच्या सर्व प्रक्रियेमुळे ते आधीच थकलेले दिसत होते, असे गर्भवती माता आणि उपचार विभागाचे प्रमुख डॉ. चिन्मय उमरजी यांनी सांगितले.
माझा मुलगा आता तीन वर्षांचा आहे आणि गेल्या तीन वर्षांत मी अनेक वेळा बालरोग वॉर्डमध्ये त्याला उपचारासाठी आणले आहे. दुसरे मूलही तसेच होईल, या भीतीपोटी या विभागात आले. घाईघाईने गर्भपाताचा निर्णय घेऊ नका, असे येथे सांगण्यात आले आणि पुढील तपासण्या झाल्याचे महिलेने सांगितले. यानंतर या जोडप्याने रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या नेतृत्वाखाली बालरोग विभागाला भेट दिली आणि पुढील उपचारांना सुरुवात झाल्याचे मातेने सांगितले.
यानंतर त्यांना डॉ. संजय तांबे यांच्या अधिपत्याखालील स्त्रीरोग विभागाकडे पाठवण्यात आले. त्यांची गर्भाच्या औषधी युनिटमध्ये ‘नुचल ट्रान्सलुसेन्सी (एनटी) स्कॅन’ आणि सीव्हीएस टेस्ट करण्यात आली. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात डॉ. उमरजी यांनी सविस्तर एनटी स्कॅन, डीएनएसाठी बाळाचे नमुने घेण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
दोन आठवड्यांनंतर अहवाल परत आला आणि बाळ निरोगी असल्याचे दाम्पत्याला सांगण्यात आले.
या दाम्पत्याप्रमाणेच अनेकजणांना या विभागाचा लाभ झाला आहे. त्याची स्थापना झाल्यापासून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातून ३०० हून अधिक रुग्णांनी ५० हून अधिक प्रक्रियांचा लाभ घेतला आहे आणि ३० हून अधिक रुग्णांना सेवांचा लाभ झाला आहे.