सीताफळाला आजवरचा उच्चांकी भाव ; किलोला मिळाले 333 रुपये

पुणे : गोड चवीच्या सीताफळाचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, तरी बाजारात अजूनही कमी प्रमाणात सिताफळाची आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी चांगली असल्याने रविवारी बाजारात सिताफळास आजवरचा उच्चांकी भाव मिळाला. घाऊक बाजारात किलोस तब्बल 333 रुपये भाव मिळाला.

मार्केटयार्डातील फळ बाजारात तुळजाराम पंथाराम बनवारी यांच्या गाळ्यावर हवेली तालुक्‍यातील वडकीचे शेतकरी बाळासाहेब साबळे यांच्या शेतातून ही सिताफळ विक्रीस दाखल झाले. डेक्कन येथील साई समर्थ फ्रुट यांनी या सीताफळांची खरेदी केली, अशी माहिती मार्केटयार्डातील फळांचे व्यापारी युवराज काची यांनी दिली.

याबाबत काची म्हणाले की, सध्या बाजारात सिताफळाची दररोज 100 किलो इतकी आवक होत आहे. आज आकार आणि दर्जानुसार एक किलो सिताफळास 50 ते 250 रुपये भाव मिळाला. पुढील आठवड्यात सिताफळाची आवक सुमारे 1 टनापर्यंत जाईल. त्यानंतर आवकेत आणखी वाढ होईल. यंदा मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाला असून मान्सूनही वेळेत दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा सीताफळाचे उत्पादन चांगले असणार आहे. येथील बाजारात वडकी, फुरसंगी, पुरंदर तालुका, तळेगाव, राजगुरूनगर, खेड, मंचर, पाटस या भागांतून सीताफळाची आवक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.