यवत : केडगाव (ता. दौंड) येथील आणखी एका 50 वर्षीय खासगी डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. तर रविवारी (दि. 21) रात्री उशिरा बोरीपारधी येथील एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच रविवारी सापडलेल्या खासगी डॉक्टरच्या संपर्कातील तीन नातेवाईकांना करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती तहसीलदार संजय पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
केडगाव परिसरात दोनच दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सहा झाली आहे. यामुळे केडगाव परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केडगाव परिसरातील दोन खासगी डॉक्टर करोना बाधित आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही डॉक्टरच्या संपर्कातील 23 जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे डॉ. रासगे यांनी सांगितले. मात्र या दोन्ही डॉक्टरच्या संपर्कात आलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून केडगाव येथील बाजारपेठ पूर्णपणे सील करण्यात आली आहे.