पुणे – मुक्ताताई टिळक या नेहमीच पक्षादेश प्रमाण मानून कार्यरत असायच्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्याचा वारसा आणि वैचारिक शिकवण त्यांनी अखेरपर्यंत जपली. त्यांच्या निधनाने सुसंस्कृत अन् कर्तव्यनिष्ठ नेतृत्त्वाला पुणे आणि महाराष्ट्र मुकला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या आदर्श कारकीर्दीला दिलेला हा उजाळा…
पक्षसंघटनेतील जबाबदाऱ्या
मुक्ताताई टिळक या भाजपच्या शहर उपाध्यक्ष, पुणे शहर महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा, प्रदेश महिला आघाडीच्या माजी उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
नगरसेवक पदाच्या कारकिर्दीतील ठळक कामे
नानावाडा येथे क्रांतिकारक संग्रहालय, सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल प्रकल्प, ओला आणि सुका कचरा प्रकल्प, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, महापालिका शाळेमध्ये विज्ञान अणि संगणक प्रयोगशाळा, उद्यानांमध्ये उपक्रम, पोलीस चौक्यांचे नूतनीकरण, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळ निर्मिती, मध्यवस्तीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सब स्टेशन उभारणीसाठी प्रयत्न. बचतगट निर्मिती आणि वसुंधरा उद्योग या लघुउद्योग प्रकल्पातून महिलांना रोजगार निर्माण करून दिला.
अन्य सामाजिक कार्य
लोकमान्य टिळक विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्यामध्ये प्रामुख्याने टिळकांच्या मंडालेहून सुटकेच्या शताब्दीनिमित्ताने 40 क्रांतिकारकांच्या परिवारांच्या देशातील पहिला नागरी सत्कार पुणेकरांच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी लोकमान्य या फोटो बायोग्राफीचे प्रकाशन केले. बाबा आमटे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आनंदवन मित्र मंडळांची स्थापना केली. त्यामाध्यमातून समाजसेवी संस्थांबरोबर काम सुरू केले. त्यामध्ये ऊस तोडणी कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, परित्यक्त्या महिलांचे पुनर्वसन आदींना सहकार्य केले जाते.
अखेर झुंज अयशस्वी… अखेर झुंज अयशस्वी…
कसबा पेठ मतदारसंघांच्या आमदार मुक्ताताई
टिळक यांची दीर्घ आजाराशी झुंज अपयशी ठरली. मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणारी तरुणी, गृहिणी, आई आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रात अनेक पदे मिळवत कसबा मतदार संघात त्या मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आल्या. त्यामुळे त्यांचा प्रगतीचा हा प्रवास विलक्षण आहे.
आमदार मुक्ताताई टिळक यांचा राजकीय प्रवास
2002 : मनपा निवडणुकीत पहिल्यांदा नारायणपेठेतून नगरसेविका
2007 : मनपा निवडणुकीत पुन्हा विजयी
2012 : निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधत नगरसेविका
2016 : पक्षाच्या महापालिकेतील गटनेतेपदाची जबाबदारी
2017 : सलग चौथ्यांदा नारायणपेठ-शनिवारपेठेतून नगरसेविका
मार्च 2017 : भाजपच्या पहिल्या महापौर
मार्च 2019 : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवड
“प्रभात’शी ऋणानुबंध…
आमदार मुक्ताताई टिळक आणि त्यांच्या परिवाराचे दैनिक “प्रभात’शी विशेष ऋणानुबंध होते. “प्रभात’तर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमात मुक्ताताई यांची आवर्जून उपस्थिती असायची. वर्धापनदिन, दिवाळी अंक प्रकाशन, महिला मंचचे कार्यक्रम या सर्व उपक्रमांना त्या आवर्जून उपस्थित असायच्या. नगरसेविका, महापौर आणि आमदार झाल्यावरही त्यांनी आवर्जून “प्रभात’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली होती. त्यांना “प्रभात’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
अखेरच्या दिवसांतही कार्यरत!
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर काही महिन्यांत मुक्ता टिळक यांना कर्करोग झाल्याचे समोर आले. मात्र, खचून न जाता मुक्ताताईंनी या आजाराशी सामना केला. उपचार सुरू असतानाही, त्या महापालिकेत उपस्थित राहायच्या. अनेकदा उपचार घेऊन आल्यानंतरही मुख्यसभांना त्या तासन्तास उपस्थित राहिल्या. यावेळी होणाऱ्या राजकीय चर्चा-गोंधळातही त्यांनी आपले आजारपण सभागृहात दिसू दिले नाही.
आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेत मुक्ताताई टिळक या शहराच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शिक्षणासह वेगवेगळ्य क्षेत्रांत त्यांनी आपला कामाचा ठसा उमटविला. विशेषत: महापालिका शाळांमधील मुलींच्या शिक्षणासह त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी विशेष प्रकल्प राबविले. त्यात मोफत सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासह सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल प्रकल्प शाळांमध्ये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी त्या आग्रही राहिल्या. त्यापुढे जाऊन महिलांच्या आरोग्यासाठी प्रत्येक वर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे महापालिकेच्या माध्यमातून भरविण्यास त्यांनी पुढाकार घेतला.
तर, अंदाजपत्रकातही पहिल्यांदाच महिलांसाठी “जेंडर बजेट’ ही संकल्पना राबविण्यासाठी त्या आग्रही राहिल्या. नानावाड्यात क्रांतिकारकांचे संग्रहालय उभारण्यात आले. पालिका शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, जुन्या वाड्यांच्या पुनर्वसन आणि नदीकाठच्या घरांच्या दुरुस्तीसाठी शासनदरबारी त्यांनी पाठपुरावा केला. हे सर्व सुरू असताना त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, त्याचा थकवा अथवा भार न घेता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आणि कर्करोगातून बाहेरही आल्या. त्यानंतर भाजपये कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. तर, मुक्ताताईंनी या निवडणुकीचा प्रचारही जोमाने केला. दिवसभर प्रभागात त्या स्वत: दुचाकी चालवित प्रचारात सहभागी व्हायच्या. त्यांच्या नेतृत्त्व आणि कार्याची दखल घेत मतदारांनीही मुक्ताताईंना आमदार म्हणून निवडून दिले. मात्र, कर्करोगाने पुन्हा त्यांना विळखा घातला. त्यामुळे प्रकृती खालावण्यास सुरूवात झाली. दरम्यन, करोना बाधा झालेल्या मुक्ताताईंनी इच्छाशक्तीच्या बळावर करोनावरही मात केली.
तर स्वत: कर्करोगाशी झुंज देत असताना मतदारसंघातील नागरिकांना करोना संकटात मदत करण्यासाठी त्या मैदानात उतरल्या. औषधेवाटप, धान्यवाटप, मास्कवाटप, तपासणी शिबिरे, वंचितांना गरजेच्या साहित्यांचे वाटप, जनजागृती उपक्रम त्यांनी राबविले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच इतर वैद्यकीय साहित्य घेण्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. त्यांची प्रकृती खालावत असल्याने अनेकदा त्यांच्यावर राजकीय टीकाही झाली. मात्र, त्यांनी लक्ष य देता अखेरच्या दिवसांतही काम सुरूच ठेवले. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली. त्यावर त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहित तसेच शासनाकडून हवे तेवढा निधी मिळवून देण्याचे सांगत रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्या सक्रीय नसल्या, तरी कुटुंबीयांच्या माध्यमातून त्यांचे कार्य अखेरपर्यंत सुरूच होते.