कोथरूड – एनडीए चौकातील (चांदणी चौक) रस्ता रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, येथील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या भिंतीवर पुणे शहरासह जिल्ह्यांची संस्कृती, परंपरा यासह ऐतिहासिक वास्तू, पर्यटनाचे दर्शन चित्राच्या माध्यमातून पाहता येणार आहे. सध्या भातशेती आणि मातीतील कुस्ती हे चित्र रेखाटण्यात येत असून, नक्कीच सुखकर आणि आनंदी प्रवासासाठी हे चित्र उपयोगी ठरतील.
एनएचएआयकडून एनडीए चौकातील रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामध्ये मुख्य चौकात उड्डाणपुलासह मुळशी, बावधन, एनडीए, कोथरूड यासह मुंबई-सातारा दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये काही ठिकाणी भुयारी मार्ग आहेत. त्यामुळे नक्कीचा हा चौक भव्य-दिव्य असून, मुख्य चौकातील विमान, जहाज आणि रणगाडा हे विशेष लक्ष वेधणार आहे. एनएचएआयच्या संकल्पनेतून उड्डाणपूल आणि भुयारी सिमेंट वॉलवरील विविध चित्रे प्रवाशांचे विशेष लक्ष वेधणार आहे.
काम अंतिम टप्प्यात…
मुळशीकडून कोथरूड आणि मुंबईला जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भिंत असून या भिंतीवर भातशेती करणारी महिला आणि महाराष्ट्राची शान असलेला “आखाड्यातील कुस्ती, मारुतीचे मंदिर’ अशी आकर्षक चित्रे प्रवाशांचे लक्ष वेधणार आहेत. टप्प्याटप्प्याने ही चित्रे रेखाटण्यात येत असून, चौकातील विविध भिंतीवर पुणे शहरासह जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, विविध परंपरा यांचा समावेश असणार आहे, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.