बामणोली -कास पठारावर तुरळक प्रमाणात फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे. ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांनी गेल्या आठवड्यापासून मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. यावर्षीच्या फुलाच्या हंगामाचा दुसरा आठवडा सुरू असून आजअखेर सात ते आठ हजार लोकांनी फुले पाहण्यासाठी कास पठारावर येथे गर्दी केली होती. परंतु, यावर्षी मोठ्या प्रमाणात फुले नसल्यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत.
जागतिक वारसा स्थळ लाभलेले पर्यटन स्थळ म्हणून कास पुष्प पठाराची ओळख आहे. कास पठारावर दरवर्षी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यामध्ये विविध प्रकारची फुले येतात. ही फुले पाण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक कास पठाराला भेट देत असतात. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने फुले भरण्याचा हंगाम पुढे गेला आहे.
गेल्या आठवड्यापासून कास पठारावर तुरळक प्रमाणात फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे. वाहनतळ पठारापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने पर्यटकांना कास पठार समितीमार्फत बस व्यवस्था केली आहे. आपले वाहन वाहनतळावर लावून फुले पाहण्यासाठी रांगा लावून कास पठारावर जावे लागत आहे.
यावर्षी कास पठारावरील फुले पाहण्यासाठी 10 ऑगस्टपासून पर्यटक येऊ लागले. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने फुले कमी प्रमाणात आली आहेत. तरी वातावरणाच्या अंदाजानुसार फुले बहरण्यास अंदाजे एक आठवडा लागू शकतो.
– विश्वनाथ बेलोशे (वनपाल, वनपरिक्षेत्र बामणोली)
सध्या रानहळद, तेरडा, मिकी माउस अशा विविध प्रकारची फुले थोड्या थोड्या प्रमाणात आली आहेत. परंतु, पावसाचे प्रमाण जास्त असल्याने यावर्षी फुले उशिरा फुलतील.
– दत्ता किर्दत (अध्यक्ष, कास पठार समिती)