शेतीमध्ये पीक नियोजन महत्त्वाचे

माजी खासदार आढळराव पाटील ः ग्लोबल फार्मर्स प्रदर्शनाचा समारोप

नारायणगाव- शेतीमधील उत्पन्नाचे वाढते प्रमाण, तंत्रज्ञानाचा अवलंब हे पाहता अनेक अनुदाने, सरकारी योजना, बाजारपेठांची उपलब्धता इत्यादी असून देखील शेतकरी वर्षानुवर्ष अडचणीत आहे. त्याच्या अडचणी कमी न होता त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. याचे कारण म्हणजे शेतीमालाचे बाजारातील चढ-उतार आणि हे होऊ नये म्हणून गावपातळीवर पिकांचे नियोजन होऊन त्याची योग्य ती अंबलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आयोजित ग्लोबल फार्मर्स प्रदर्शनाच्या समारोपावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी विनयकुमार आवटे, राजश्री बेनके, जुन्नर तालुक्‍याचे उपसभापती रमेश खुडे, शिवसेना तालुका प्रमुख माउली खंडागळे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, संचालक डॉ. संदीप डोळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात केंद्राचे चेअरमन अनिल मेहेर यांनी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढीसाठी राबविण्यात आलेल्या, येणाऱ्या योजना तसेच नवउद्योजक तयार होण्यासाठी केवीके करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितले. या कार्यक्रमात कृषी तंत्र निकेतन विद्यालयात ज्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड झाली त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काजी, सुनील ढवले यांनी केले. आभार ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी शिक्षण संकुलाचे व्यवस्थापक बाळासाहेब भुजबळ यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.