#RanjiTrophy : महाराष्ट्राचा झारखंडवर ८ विकेट्सनी शानदार विजय

पुणे : विजयासाठीचे ४८ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने ५.५ षटकांत पूर्ण करत रणजी करंडक स्पर्धेत झारखंडचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह महाराष्ट्राने ६ गुण आपल्या खात्यात जमा केले आहे. सामन्यात एकूण १४९ (१४०,९) धावा करणारा आणि ३ (२,१) विकेट घेणारा अझीम काझी सामन्याचा मानकरी ठरला.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अझीम काझीच्या १४० आणि विशांत मोरेच्या १२० धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ४३४ धावा केल्या होत्या. झारखंडकडून पहिल्या डावात उत्कर्ष सिंगने सर्वाधिक ५ तर राहुल शुक्लाने ३ गडी बाद केले.

त्यानंतर महाराष्ट्राने झारखंडला पहिल्या डावात १७० धावांत गुंडाळत २६४ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे महाराष्ट्राने झारखंडवर फाॅलोआॅन लादण्याचा निर्णय घेतला. झारखंडकडून पहिल्या डावात फलंदाजीत सौरभ तिवारीने सर्वाधिक ६२ आणि विराट सिंगने ४३ धावा केल्या. अन्य एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात सत्यजित बच्छावने सर्वाधिक ५ , चौधरीने ३ आणि अझीम काझीने २ गडी बाद केले.

फाॅलोआॅनची नामुष्की ओढवल्यानंतर झारखंडने दुस-या डावात कुमार सूरजच्या ९२, सौरभ तिवारीच्या ८७ आणि एमडी नाझीमच्या ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद ३११ धावा करत महाराष्ट्रासमोर विजयासाठी ४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुस-या डावात महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छावने ४, चौधरीने ३ तर अझीम काझी, गुगळे आणि इंगळेने प्रत्येकी एक गडी बाद केला.

अखेरचा दिवसाचा ६ षटकांचा खेळ शिल्लक राहिल्याने महाराष्ट्राला ४८ धावांचे लक्ष्य केवळ ६ षटकांत पूर्ण करायचे होते, त्यामुळे विजयासाठीचे ४८ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने ५.५ षटकांत दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय संपादित केला. दुस-या डावात महाराष्ट्राचे सलामीचे फलंदाज स्वप्निल गुगळे ३ तर अझीम काझी ९ धावांवर झटपट बाद झाले. त्यानंतर अंकित बावणेने नाबाद ७ आणि नैशाद शेखने नाबाद २६ धावा करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.