आरोग्य विभागाचे आदेश : करोनाबाधित वाढणार?
पुणे – शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याच्या निकषांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि लक्षणे सुरू झाल्यानंतर 14 दिवसांमध्ये ज्या-ज्या व्यक्ती संपर्कात आल्या असतील, त्या सर्वांना संपर्क करून त्याच व्यक्तींचा शोध घेण्याचे नवे नियम आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत.
बाधित व्यक्ती सापडल्यानंतर मागील 14 दिवसांत ती व्यक्ती ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली त्या सर्वांना संपर्कातील व्यक्ती समजून त्यांचा शोध घेण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने त्यात अंशतः बदल केल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या व्यक्तींच्या निकषांमध्ये काही बदल केल्याचे आरोग्य खात्याने स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या नव्या नियमांमुळे लक्षणे येण्यापूर्वीच्या दोन दिवसांतील आणि नंतरच्या दिवसांतील संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतल्यास त्यामुळे रुग्णसंख्या वाढणार आहे. तसेच संपर्कातील व्यक्ती सुटू शकणार नाही. संशयितांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यामार्फत होणारा संसर्ग पसरण्याऐवजी तो रोखण्यास मदत होणार आहे, असा विश्वास आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.