पुणे – दहशत माजवण्यासाठी पिस्तूल व पालघन बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडे पिस्तूल, पालघन आणी दोन काडतूसे सापडली. त्याच्याविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दार्थ विजय गायकवाड उर्फ चॉकलेट(19, रा.अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो चायनिज पदार्थाची हातगाडी चालवतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार हे गस्त घालत असताना पोलीस हवालदार कुंदन शिंदे व पोलीस शिपाई अमित सुर्वे यांना चॉकलेट हा सॅकमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व पालघन घेऊन अरण्येश्वरच्या कमानिजवळ उभा असल्याची खबर मिळाली. त्यानूसार तातडीने सापळा रचून त्याला जागेवरच ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सॅकची झडती घेतली असता, त्यामध्ये हत्यारे मिळून आली. याची किंमत साधारण 30 हजार 600 रुपये इतकी आहे. चॉकलेटवर अल्पवयीन असल्यापासून गुन्हे दाखल आहेत. भांडणे, मारामारी यासारखे गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात आहेत. त्याने हत्यारे कशासाठी आणली होती याची चौकशी केली जात आहे. याचा तपास पोलीस हवालदार सुधीर घोटकुले करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजु जाधव, पोलीस अंमलदार, अमित सुर्वे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, नवनाथ भोसले, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, प्रमोद भोसले, शरद राऊत, विष्णू सुतार यांच्या पथकाने केली.