पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाने गस्ती दरम्यान दिड किलो गांजा जप्त केला. एका संशयीत व्यक्तीचा पाठलाग करुन ही कारवाई करण्यात आली.
अर्जुन दिगंबर जाधव(52,रा.कात्रज, मुळ उस्मानाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मजुरी काम करतो. त्याने गांजा कोठून आणला याची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार राहुल तांबे व सचिन पवार यांना गायमुख चौकात जाधव संशयास्पदरीत्या उभा दिसला.
पोलिसांचे पथक त्याच्या दिशेने जात असताना तो पोलिसांना बघुन पळून जाऊ लागला. त्याला पाठलाग करुन थोड्याच अंतरावर पकडण्यात आले. त्याच्याकडील पिशवी तपासली असता, खाकी कागदामध्ये दिड किलो गांजा सापडला. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
त्यानूसार पोलीस अंमलदार सोमनाथ सुतार यांनी फिर्याद दिली. जाधव याच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे,पोलीस अंमलदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रविंद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.