पुणे – तडीपारीचा भंग करुन हद्दीत आलेल्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी भवानी पेठेत करण्यात आली. समर्थ पोलिस ठाण्यातील गस्तीवरच्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
आबिद अलिम बागवान(28,रा.लालवाडा, भवानी पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला 4 जानेवारी 2020 रोजी परिमंडळ एकच्या उपायुक्तांच्या आदेशानूसार तडीपार करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तडपारीचे उल्लंघन करुन बागवान हा भवानी पेठ परिसरात येणार असल्याची खबर तपास पथकातील पोलिस शिपाई निलेश साबळे व सुमित खुट्टे यांना मिळाली होती.
त्यानूसार त्याचा शोध घेतला असता, तो भारत टॉकिजजवळ थांबल्याचे आढळून आले. पोलिसांना बघुन तो पळून जात होता. मात्र त्याला पाठलाग करुन थोड्याच अंतरावर पकडण्यात आले. तडीपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर अगोदर घरफोडी आणी दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर वारंवार कारवाई करुनही सुधारणा होत नसल्याने त्याला दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलिस कर्मचारी सुमीत खुट्टे व निलेश साबळे यांच्या पथकाने केली.