तामिळनाडू – आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तामिळनाडूतील अल्पवयीन गरोदर शाळकरी मुलीचा उपचारा दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, वसतीगृहाचा वॉर्डन आणि अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोक्सो कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी मूळची चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम गावातील रहिवासी असून तिरुवन्नमलाई येथील शाळेत शिकत होती.
पीडित मुलगी तिरुवन्नमलाई येथील शाळेतील वसतिगृहात राहत होती. काही दिवसांपूर्वी पीडिता आपल्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम गावी आली होती. घरी आल्यावर मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु होते.
यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेच्या शेजारीच हरिप्रसाद नावाची व्यक्ती राहते. या व्यक्तीनेच मुलीचे लैंगिक शोषण केल्याने मुलगी गरोदर राहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी या विद्यार्थीनीचा रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.