लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच तापू लागले असून राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच निर्णय जाहीर केला आहे. अगोदर ते अयोध्येतून लढणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र त्याला नंतर पूर्ण विराम देण्यात आला. आता यासंदर्भात नवी बातमी आली आहे. योगी यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे निवडणूक लढवणार आहेत.
गोरखपूर मतदारसंघातून ते योगी आदित्यनाथ यांचा सामना करतील. चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीसोबत युतीची चर्चा अपयशी ठरल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, ते गोरखपूर येथून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढतील.
चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून समजावादी पक्षासोबत तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी मागितल्या तेवढ्या जागा देण्यास समाजवादी पार्टी नकार देत आहे. त्यामुळे आता समाजवादी पार्टीने 100 जागा दिल्या तरीही त्यांच्यासोबत युती करणार नाही, अशी भूमिका आझाद समाज पार्टीने घेतली आहे.