मांडवगण फराटा – न्हावरे (ता. शिरूर) येथे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला भर रस्त्यावर लुटण्याची घटना शुक्रवारी (दि. 25) घडली होती. या घटनेतील परराज्यातील अट्टल गुन्हेगारांना अवघ्या पाच दिवसांत जेरबंद करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी (दि. 25) दुपारी दोनच्या सुमारास बाळासाहेब बबनराव खेडकर (रा. शिंदोडी ता. शिरूर) हे त्यांच्या नातेवाईकांसह बॅंक
ऑफ इंडिया न्हावरे शाखेत 7 लाख 13 हजार रुपये कर्जाची रक्कम भरण्यासाठी न्हावरे ते चौफुला रस्त्याने बॅंकेकडे पायी जात होते. दरम्यान न्हावरे गावातून पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन दोन जणांनी खेडकर यांच्या हातातील एकूण 7 लाख 13 हजार रुपयांची पैशाची पिशवी जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला.
परंतु ती पिशवी फाटल्याने 7 लाख 13 हजार रुपये पैकी 70 हजार रूपये सदर मोटार सायकलवरील चोरांच्या हाती लागले होते व उर्वरीत रक्कम रस्त्यावर पडली होती. त्यामुळे 70 हजार रुपये रोख रक्कम चोरून ते चोरटे मोटारसायकलवरून चौफुलाचे दिशेने पळून गेले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपी दौंड भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार तपास पथकाने दौंड भागात सापळा रचून त्यांना सिद्धटेक रस्त्यावर पाठलाग करून मोठ्या शिताफिने पकडले.