नाशिक – राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा आणि त्यांची वकिलीची सनद रद्द करा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला होता.
सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुणरत्न सदावर्तेंविरोधात कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला. उत्तरेश्वर पेठ तरुण मंडळाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारुन निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.