पुणे : भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या सहा जणांना स्वारगेट पोलिसांनी पकडले. गुलटेकडी भागातील एका सोसायटीतील सदनिकेत ही कारवाई करण्यात आली. सट्टेबाजांकडून मोबाइल, लॅपटॉप तसेच रोकड असा सात लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
अंबादास चंद्रकांत तावस्कर (वय 23, रा. धाराशिव), समीर यशवंत जाधव (वय 41, रा. सोमवार पेठ), धनंजय सूर्यकांत गायकवाड (वय 34, रा. घोरपडी), अनिल रत्नाकर बलकवडे (वय 36, रा. सदाशिव पेठ), दिनेशकुमार मांगीलाल प्रजापती (वय 25), राहुल मीठालाल पालेवाल (वय 25, दोघे मूळ रा. राजस्थान, जोधपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वी भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान मर्यादित षटकांचा सामना पार पडला. गुलटेकडीतील एका सोसायटीतील सदनिकेत सट्टेबाज ऑनलाइन बेटिंग घेत असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला पोलिसांनी मोबाइल संच, लॅपटॉप, 13 हजार 900 रुपये, जुगाराचे साहित्य असा सात लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी त्यांच्याकडील मोबाइलमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असलेल्या सीमकार्डचा वापर करत असल्याचे उघडकीस आले. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ तपास करत आहेत.