मुंबई – जुहू या मुंबईच्या पश्चिम उपनगरात अभिनेत्री काव्या थापर हिने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका थांबलेल्या वाहनाला धडक देण्याचा प्रकार गुरूवारी पहाटेच्या सुमाराला घडला. या प्रकारानंतर तिने तेथे आलेल्या पोलिसांशीच हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. गुरुवारी पहाटे 1 च्या सुमारास जुहू येथील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलजवळ ही घटना घडली, तेव्हा काव्या थापर दारूच्या नशेत तिची एसयूव्ही चालवत होती. एका थांबलेल्या वाहनाला तिची गाडी धडकली. तेथील काही नागरीकांनी हा प्रकार पोलिस नियंत्रण कक्षाला कळवला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तिथे दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनाच तिने तिथे शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर ती धाऊन गेली होती.