हैदराबाद/लंडन :- उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या मूळच्या हैदराबादेतील एका युवतीची लंडनमध्ये हत्या झाली आहे. ती रहात असलेल्या वेम्बले भागातील फ्लॅटमध्ये मंगळवारी भोसकून तिची हत्या करण्यात आली आहे, असे लंडनच्या महानगर पोलिसांनी म्हटले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे.
लंडनच्या पोलिसांनी 2 संशयित हल्लेखोराचे फोटो प्रसिद्ध होते आणि त्याला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार ब्राझिलचा नागरिक असलेल्या 23 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.
कोंथम तेजस्विनी असे हत्या झालेल्या भारतीय युवतीचे नाव असल्याचे समजते आहे. तेजस्विनी बरोबर रहात असलेल्या 28 वर्षीय एका अन्य युवतीवरही हल्लेखोरांनी वार केले असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला झालेली दुखापत गंभीर नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
तेजस्विनी 3 वर्षांपूर्वी लंडनमध्ये “मास्टर ऑफ सायन्स’चा अभ्यासक्रम करण्यासाठी गेली होती. तिने तिचा अभ्यासक्रम पूर्ण देखील केला होता. ती या वर्षी मे महिन्यात भारतात परत येणार होती.
तिच्या घरच्यांनी तिचा विवाह निश्चित करण्याचेही ठरवले होते. तिची हत्या झाल्याचे तिच्या कुटुंबियांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. तिचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी तिच्या घरच्यांनी सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.